दाढीधारकांना वरदान ठरणार शाओमीचे ‘हे’ उपकरण !

0

शाओमीने खास दाढीधारकांसाठी मी बिअर्ड ट्रिमर सादर केला असून या माध्यमातून वैविध्यपूर्ण उत्पादनांची परंपरा कायम राखली आहे.

शाओमी कंपनी ही आपल्या वैविध्यपूर्ण उत्पादनांसाठी ख्यात आहे. स्मार्टफोनच्या बाजारपेठेवर जबरदस्त पकड मजबूत करतांना शाओमीने जाणीवपूर्वक आपल्या उत्पादनांमध्ये वैविध्यता जोपासली आहे. यातच भारतासारख्या अजस्त्र बाजारपेठेसाठी या कंपनीने एकामागून एक विविध प्रॉडक्ट सादर करण्याचा जणू काही सपाटाच लावला आहे. अलीकडेच शाओमीने भारतीय ग्राहकांसाठी शूज सादर केले होते. यानंतर आज चक्क बिअर्ड ट्रिमर लाँच करण्यात आले आहे. भारतात तरूणांची संख्या जास्त असून दाढी ही फॅशन म्हणून प्रचलीत झालेली आहे. याचा विचार करता, दाढीला विविध आकार प्रदान करण्यासाठी मी बिअर्ड ट्रिमर उपयुक्त ठरणार आहे. याचे मूल्य १,९९९ रूपये असून याला मी.कॉम आणि फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.

मी बिअर्ड ट्रिमरचा आकार हा अतिशय आटोपशीर असून याला कुठेही सहजपणे ने-आण करता येणार आहे. यात उत्तम पकडदेखील दिली असल्याने याचा सुलभपणे वापर करता येईल. हे मॉडेल आयपीएक्स७ ने प्रमाणिक आहे. अर्थात हे वॉटरप्रूफ असून याला नळाखाली धुण्याची सुविधा मिळणार आहे. यात दाढीला कौशल्याने आकार देण्यासाठी तब्बल ४० प्रकारच्या विविध सेटींग्ज करण्याची सुविधा दिलेली आहे. यातील ब्लेडचे पाते हे अतिशय धारदार असून ते सेल्फ शार्पनींग या प्रकारातील असल्याने त्यांना बदलावे लागणार नाही. तसेच यात दोन प्रकारचे कंगवे दिलेले आहेत. हे मॉडेल युएसबी चार्जरच्या मदतीने चार्ज करता येणार आहे. अवघ्या पाच मिनिटांच्या चार्जींगमध्ये यात दहा मिनिटांचा बॅकअप मिळणार आहे. तर पूर्ण चार्ज झाल्यावर हे मॉडेल ९० मिनिटांपर्यंत वापरता येणार आहे. यात ट्रॅव्हल मोडदेखील दिला असून याच्या मदतीने प्रवासात बॅटरीचा कमी वापर करून याला वापरता येईल. हे उपकरण कॉर्डसह आणि कॉर्डविना या दोन्ही प्रकारांमध्ये वापरता येणार आहे.

पहा : मी बिअर्ड ट्रिमरची माहिती देणारा व्हिडीओ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here