युट्युबने भारतीय युजर्ससाठी ‘लर्नींग डेस्टीनेशन’ हा स्वतंत्र विभाग तयार केला असून यात सर्व शैक्षणिक व्हिडीओज एकाच ठिकाणी देण्यात येणार आहेत.
लॉकडाऊनमुळे तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही आमूलाग्र बदल होऊ लागले आहेत. ज्या प्रकारे ‘वर्क फ्रॉम होम’ प्रणाली लोकप्रिय होऊ लागलीय, अगदी त्याच प्रमाणे ‘एज्युकेशन फ्रॉम होम’ ही संकल्पनाही आता प्रत्यक्षात अवतरली आहे. व्हर्च्युअल क्लासरूमसह विविध अॅप्सच्या माध्यमातून विद्यार्थी घरबसल्या अभ्यास करत असल्याचे आजचे चित्र आहे. नेमक्या याच बाबीचा लाभ घेण्यासाठी टेक कंपन्या देखील पुढे सरसावल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाने गुगलने आपल्या भारतीय युजर्ससाठी लर्नींग डेस्टीनेशन हा स्वतंत्र विभाग तयार केला आहे. यात मराठीसह इंग्रजी हिंदी व अन्य सात भारतीय भाषांमधील शैक्षणिक व्हिडीओज एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. यात अगदी शालेय शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंतचे व्हिडीओज उपलब्ध आहेत. याच्या जोडीला विविध प्रकारच्या स्कील डेव्हलपमेंटचे प्रशिक्षण देणारे व्हिडीओज सुध्दा यात देण्यात आलेले आहेत.
युट्युबवर अक्षरश: लक्षावधी एज्युकेशनल व्हिडीओज उपलब्ध असून यात प्रत्येक क्षणाला भर पडत आहे. तथापि, हे सर्व व्हिडीओज विखुरलेले असून यांना एकाच ठिकाणी पाहता यावे यासाठी लर्नींग डेस्टीनेशन हा विभाग कार्यान्वित करण्यात आला आहे. यात विविध क्रियेटर्सच्या व्हिडीओजचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.
लिंक : युट्युब लर्नींग डेस्टीनेशन https://www.youtube.com/learning